सबका साथ, सब को निवास’ हे क्रेडाईचे ध्येय: शहा
पुणे : क्रेडाईच्या यशस्वी वाटचालीत महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहे. क्रेडाई हे एक कुटूंब आहे. एकी आणि पारदर्शकता हीच क्रेडाईची खरी ताकद आहे. आगामी काळात सबका साथ, सबका विकास आणि सबको निवास या ध्येयाने आपण कार्य करू, देशाच्या उज्ज्वल भवितव्यास हातभार लावू, असे प्रतिपादन क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा यांनी येथे केले. क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने हॉटेल ह्यात
पुणे : क्रेडाईच्या यशस्वी वाटचालीत महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहे. क्रेडाई हे एक कुटूंब आहे. एकी आणि पारदर्शकता हीच क्रेडाईची खरी ताकद आहे. आगामी काळात सबका साथ, सबका विकास आणि सबको निवास या ध्येयाने आपण कार्य करू, देशाच्या उज्ज्वल भवितव्यास हातभार लावू, असे प्रतिपादन क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा यांनी येथे केले.
क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने हॉटेल ह्यात रिजन्सी येथे दोन दिवसीय परिषद भरविण्यात आली होती. यावेळी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ते बोलत होते. क्रेडाई नॅशनलचे माजी अध्यक्ष कुमार गेरा, क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद , क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष बोमन इराणी, सचिव रोहित राज मोदी, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यशस्वी नेतृत्वाविषयी बोलताना शहा म्हणाले की, बहुआयामी गुण अंगिकारून तुम्ही स्वतःला यशस्वी नेतृत्व घडवू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवसायाचे नेतृत्व करता तेव्हा तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींचा इतरांवर प्रभाव पडत असतो. तुम्हाला अनेक जण आदर्श मानत असतात. हे लक्षात घ्यायला हवे. काय करावे व काय करू नये हे सुद्धा कळले तरच तुम्ही स्वतःची वाटचाल यशस्वी नेतृत्वाच्या दिशेने करू शकता, असेही त्यांनी सांगितले.
इराणी म्हणाले, ‘जो माणूस यशाचे श्रेय दुसऱ्याला देतो आणि चुकांची जबाबदारी स्वतः स्वीकारतो तोच यशस्वी नेतृत्व करू शकतो. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केलेत, आपल्या नेतृत्वाखाली काम करण्यावर विश्वास दाखवला तर तुम्ही नक्कीच आपल्या कार्यात यशस्वी होऊ शकता.’
तर क्रेडाईची जन्मभूमी व कर्मभूमी महाराष्ट्र आहे. अनेक महत्वपूर्ण निर्णय, योजनांची सुरुवात क्रेडाईने महाराष्ट्रातून केली आहे. ललीतकुमार जैन, सतीश मगर, कुमार गेरा यांच्यासारखे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रभावी नेतृत्व महाराष्ट्रानेच क्रेडाईला दिले असल्याच्या भावना रोहित राज मोदी तसेच गीतांबर आनंद यांनी व्यक्त केल्या.
यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष पंकज कोठारी, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनंत राजेगांवकर यांनी नेतृत्व विकास व नेतृत्व कौशल्य याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने भरविण्यात आलेल्या या परिषदेस ५० हून अधिक शहरातून २०० पेक्षा जास्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी क्रेडाई महाराष्ट्र मध्ये स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या महिला समिती मधील कर्तृत्ववान उद्योजिकांचाही सत्कार करण्यात आला. ही दोन दिवसीय परिषद आमच्यासाठी फलदायी ठरली असल्याच्या भावना क्रेडाई महाराष्ट्राच्या विविध शहरातील प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केल्या.
Comment List